Aadhaar Biometrics : आजच्या डिजिटल युगात 'आधार' हे केवळ ओळखपत्र नाही तर तुमच्या बँक खात्यापासून अनेक सरकारी कामासाठी महत्त्वाचे दस्तावेज आहे. मात्र, याच आधारचा वापर करून सायबर गुन्हेगार लोकांची बँक खाती रिकामी करत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. पॅन कार्ड, मोबाईल नंबर आणि बँक खात्याशी आधार जोडलेले असल्याने, ते सुरक्षित ठेवणे आता अनिवार्य झाले आहे.
बायोमॅट्रिक लॉक
आधार कार्डमध्ये आपली वैयक्तिक माहिती आणि फिंगरप्रिंट्स, डोळ्यांचे स्कॅनिंग यांसारखी बायोमॅट्रिक माहिती असते. स्कॅमर्स अनेकदा 'आधार इनेबल्ड पेमेंट सिस्टम'चा गैरवापर करून फिंगरप्रिंट्सद्वारे पैसे लंपास करतात. हे टाळण्यासाठी 'युआयडीएआय'ने बायोमॅट्रिक लॉकची सुविधा दिली आहे. एकदा का तुम्ही बायोमॅट्रिक लॉक केले, की तुमच्या परवानगीशिवाय कोणीही तुमच्या अंगठ्याचा ठसा किंवा डोळ्यांचे स्कॅनिंग वापरून व्यवहार करू शकणार नाही.
आधार बायोमॅट्रिक लॉक/अनलॉक कसे करावे?
- सर्वप्रथम आधार कार्डच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
- होमपेजवरील 'My Aadhaar' या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर 'Aadhaar Services' या विभागात जाऊन ‘Lock/Unlock Biometrics’ हा पर्याय निवडा.
- तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड टाकून 'Send OTP' वर क्लिक करा.
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी प्रविष्ट करा.
- बायोमॅट्रिक लॉकिंगच्या पर्यायासमोर टिक करा आणि 'Enable' बटणावर क्लिक करा.
'मास्क्ड आधार' म्हणजे काय?
अनेकदा आपल्याला हॉटेल बुकिंग किंवा ओळखीचा पुरावा म्हणून आधारची प्रत द्यावी लागते. अशा वेळी 'मास्क्ड आधार' वापरणे सर्वात सुरक्षित असते. यामध्ये आधारचे पहिले ८ अंक लपवलेले असतात (उदा. xxxx-xxxx-1234) आणि फक्त शेवटचे ४ अंक दिसतात. यामुळे तुमची संपूर्ण ओळख उघड होत नाही आणि गैरवापराचा धोका टळतो.
वाचा - बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
या चुका टाळा!
- कधीही आपले आधार कार्ड किंवा त्याची फोटो प्रत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करू नका.
- सायबर कॅफेमध्ये आधार डाऊनलोड केल्यास तिथून फाईल डिलीट करायला विसरू नका.
- आधारशी संबंधित कोणताही ओटीपी अनोळखी व्यक्तीला सांगू नका.
